तुझीच..

आभाळभर ओलं…
ह्रदयात खोल..
सर तुझीच….

बेभान वारा..
देहभान सारा..
सय तुझीच..

राहीलेला गारवा
कुणी छेडी मारवा..
सल तुझीच..

– अखिल जोशी

पाऊस

तू असताना “कळतो” पाऊस
तू नसताना “छळतो” पाऊस

निरोप घेऊन मागे वळता
गालावर ओघळतो पाऊस

थेंब झेलती फुले सुगंधी
पानावर सळसळतो पाऊस

दूर डोंगरावरी सयींच्या
धबाधबा कोसळतो पाऊस

चाल ऐकुनी चाहूल देतो
पैंजणात घुटमळतो पाऊस

तुझा रेशमी स्पर्श होऊनी
क्षणामध्ये विरघळतो पाऊस

तुला बिलगता वीज होऊनी
माझ्यावर कोसळतो पाऊस

हट्ट

लवकर पाऊस यावा असा माझा  हट्ट नाही
तसं माझं पावसाशी नातं काही घट्ट नाही

उजाड झालाय उजेड, काळोखही मिट्ट नाही
उनाड वारा एसीत बंद, हौस माझी फिट्ट नाही

जून

पावसा ये कमिंग सून
अस म्हणत आला जून

कौलाने पाहिले चपापून
झाडून घेऊ आहे तो उन

लहरी जरी आहे मान्सून
वाट पाहतो मनापासून. .

सरी तुझ्यातून माझ्यातून..
तशाच कागदी होडीतून

सूर्यच गेलाय पार वितळून
शोधतोय ढगांची एखादी खुण

उदास उदास मनातून.
हिरवी लहर एक आतून

तुझ्यासाठी ठेवली जपून.
एक जुनी आवडती धून ..

रोज रोज वाटते उठून.
आजतरी येशील, घेशील बसून.

तुझ्यातले माझ्यातले.
क्षण हसरे घेशील साठवून …

येशील ना पुन्हा परतून.….
नाहीतर निघून जाईल जून

– अखिल