तू असा अव्यक्त का झालास..!!

तू असा अव्यक्त का झालास..एका एकी..
तू आलास तेव्हा होती किती अपुली ‘एकी’

गरजलास, बरसलास… वणवा कसा केलास शांत
प्रसन्न, उल्हासित केलेस झालेले मन क्लांत..

त्याच दिवशी झाली मैत्री, केलेस घर मनात..
खरा पावूस अनुभवला मी माझ्या तना-मनात…

तुझ्या येण्याने आली भूमिलाही हिरवळ..
आजही आठवतो तुझ्या येण्याने पसरलेला तो दरवळ…

श्रावणात तर तुझा रंगच न्यारा असायचा..
सोबतीला आकाशात इंद्रधनू असायचा..

सूर्य रुसलेला तरी दिशा,निशा सोबत होत्या..
पागोळीच्या पाण्यासोबत…ठरलेल्या भेटी होत्या..

आता गेलाच आहे तरी वेडी आस आहे..
पुढच्या वेळेस आपली भेट हमखास आहे..

असाच ये वाजत गाजत… मुसळधार…
चार महिने ऐकू दे सतत तुझी संततधार..

डोळ्यात पाणी आणून तुझी वाट बघतोय…!~

पावसाने..

पावसाने भिजला सारा… आभाळ, रान ….माती..
लटकणारे थेंब….जणू चकाकणारे मोती..

पावसाने दिला मला… उत्साह, उधाण… हाती..
संथ निशाही झाल्या… मोहमयी राती..

पावसाने दिला संदेश… गुज सांगितले कानी..
संदेश होता मुक्ततेचा..गुज प्रीतीचे मनी..

पावसाने सरी दिल्या…भिजलो अंगणी…
फुलेही मोहरली… पाकळ्या फुलल्या जीवनी…

आभाराची पावती…!

कसा असा हा पावूस ऐसा याद तुझी घेवूनी यायचा…
तू जवळी असताना तुला अलगद ग छेडून जायचा..

कळावे न त्याला म्हणून मिठीत माझ्या शिरायाचिस तू..
हलकेच सोडून श्वास चाहूल पावसाला द्यायचीस तू..

गाठून तुला तो वा-याच्या संगे..न्यायचाच कि त्याच्या सवे…
घेवूनी थेम्बाना ओंजळीत तू… जायचीस त्याच्या सवे..

असावे तिच्या मिठीत तर… हलकेच तिला थेंबानी भेटायचा..
घरी ती तिच्या जाताना.. रस्त्यावरील प्रतीबिम्बानी भेटायचा..

कधीकधी ‘तू ‘खूपच छान मला वाटायचास..
जेव्हा विजेला मोठा आवाज करायला सांगायचास..
कारण तेव्हा ‘ती’ घाबरून असायची मला बिलगलेली….
आठवते का तुला मी ‘आभाराची पावती’ पाठवलेली..

पाऊस नवा…!

पाऊस नवा……… पाऊस हवा..
प्रत्येक ढगात… आठवणींचा थवा ..

पाऊस पायवाट… पाऊस हिरवळ..
मातीतून सुटलेली सुगंधी दरवळ..

पाऊस जरासा.. पाऊस भरोसा..
आठवणीच्या पागोळीस …जरासा दिलासा..

पाऊस दिशा.. पाऊस आशा
सरींच्या नशेत…धुंदल्या दिशा..

पाऊस नदी… पाऊस झरा…
पाना-पानातून वाहणारा गार वारा…

पाऊस तुफान.. पाऊस दर्याला उधाण..
उसळत्या लाटांना… प्रेमाची आण..

पाऊस शांत… पाऊस चिंब..
डोळ्यात भिजलेले तुझे प्रतिबिंब…

पाऊस तू.. पाऊस मी…
जगण्याच्या उत्साहाची…आल्हाददायक हमी..

नवी नवी…!

काढले मी वैशाख वणवे… सांगू कसे मी रे तुला..
समजुनी तू घे मला नि चिंब ओले कर मला..

ऐसी होती तृषार्त दृष्टी… शुष्क होती पापणी..
आठवणी बरसल्या अशा… ओलेते केले अश्रुनी..

विरहाची सजा का? का असा दुरावा बोल…?
तू अशी अव्यक्त का नि मी असा का अबोल…?

तू न जावे परत फिरुनी.. दे वचन याचे मला…
तुझे मौन हे जीवघेणे… तेच जास्त जाचे मला..

याच जन्मी तूच नेहमी… वाटे मला हवी हवी…
तूच भेटावीस मजला…. प्रत्येक क्षणाला नवी नवी…

होते..

भरोसा ठेवला ज्या सावलीवर..
त्याचे सूर्याशी कधीचेच नाते होते..

मी पाहिली वाट तुझी कितीक
त्या वाटेवरून आधीच कुणी गेले होते..

वा-याशी सलगी कराया निघालो..
त्याने आधीच तुला छेडले होते..

किती पाणीशार डोळे तुझे ते
का पाहण्याआधी मी ते रडले होते..

पाऊस आला आणि गेला
मज सोडून तुलाच त्याने भिजविले होते..

तुला नजर लागण्याची चिंताच नव्हती…
नजर लागणा-या सर्वांनी.. तुला पहिले होते…

पावसाला काय…?

पावसाला काय…?
कधी येईल उनाड मुलासारखा..
उधळवून लावेल सोबत वा-याला घेवून येत..
उडतील पाचोळे…लोक पळू लागतील सैरा वैरा…
मनसोक्त भिजणारे थोडेच असतील त्या गर्दीत..
काहीजण भिजतील नाईलजाने …
तरीही मनाला भिजविणारा पावूस
शोधात असेलच कुणीतरी… त्या गर्दीत..

घामोळ्याना घालवायला… कुणी भिजेल..
कुणी पैसा झाला खोटा म्हणत भिजेल..
कुणी पागोळीच्या थेम्बाखाली भिजेल..
कुणी फाटणा-या आभाळाखाली भिजेल..

भिजलाच नाही कुणी तर उन नाही भिजणार…
कुठेतरी गायब होवून कुणालाच नाही सापडणार..
कधीतरी सटीसमाशी दिसेल मग आकाशात..
इंद्रधनुचे रंग पसरत.. श्रावण येईल दिमाखात..
श्रावण सारी मग पुन्हा मनावर नाचू लागतील..
मोर पावलांनी काव्य सुचू लागतील..
कागदी होड्या पागोळीच्या पाण्यात दौलतील..
मनातली पागोळ्यातील आठवणीही भिजतील..

येताना जसा गडगडला तसाच जातानाही रुबाब असेल..
पुन्हा येणार केव्हा ? विचारातच…
‘आपला काही भरोसा नाही’ असा जवाब असेल..

भरून येता आभाळ..

भरून येता आभाळ
तू खिडकीपाशी का येतेस..
दिसलो मी कि पडदा हळूच
ओढून तू का घेतेस..

कोसळला तो मुसळधार कि
चिंब चिंब तू हि भिजतेस..
अनोळखी न बेभरवशी
पावसास त्या का मिळतेस

समोर येत माझ्या तू
पडदा लज्जेचा का ओढतेस..
खात्री करुनी घेण्या माझ्या गमनाची
तिरपा कटाक्ष का टाकतेस..

मोह न होतो, परी सर्वथा..
तू प्रीतीची फुले पांघरतेस..
असा कोण तुझा तो पावूस लागतो…
त्याला तू जवळी करतेस..?

पर्यावरण दिन

आज पर्यावरण दिन आहे.. उन्हाळ्याच्या दिवसात ए सी लावायची चर्चा होवून कृती झाली पण आज फक्त झाडे लावायची चर्चा होईल .. ती जगातील का मारतील का झाडे किती लावली याचे आकडे कागदावरच राहतील? प्रत्येकाने ए सी घेण्यापेक्षा वर्षामध्ये ५ झाडे लावून ती जर जागवली तर ए सी ची गरजच लागणार नाही का? \ भविष्याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक जन आजचे solution काढतो आहे.. आजचे जीवन सुखकर करण्यात धन्यता माणूस भविष्य अंध:कारमय बनवत आहे.. हे कुठेतरी बदलायला पाहिजे न? या आपल्यापासूनच सुरुवात करू…