आलाच नाहीस…

आलाच नाहीस…
अरे तू येणार म्हणून आधी तू काळोख करतोस..
आधी वा-याला धाडतोस
मग गारवा वगैरे निर्माण करतोस…..
झाडं, पानं, हलायला लागली कि जरा वेग वाढवतोस…
सळसळ पानाच्या फांद्या झुकायला लागतात…
आणि मग वा -याचा वेग प्रचंड वाढतो…
पानं गळतात फांद्यांचे बारीक तुकडे पडतात पत्र्यांवर…
पत्रेही जरासे उडू लागतात ….
तडतड आवाज होतो….
तुझी चाहूल लागते..
पण काय होते कुणास ठाऊक …
तू येत नाहीस….
तुझ हे अस किती दिवस चालायचा?
तू येणार म्हणून कित्ती कविता झाल्यात तुझ्यावर..
तू यायच्या आधीच….
तू आला नाहीस जमिनीवर….
पण तू धबाधबा कोसळतो आहेस facebook वर
तू जमिनीवर यायलाच हव….. कारण..
या जमिनीवर जसा सुगंध जन्मतो ना….
तसा नाही जन्मत….facebook वर

तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…

वा-याची सुरु झाली ढगांशी लढाई…
चमकत चमकत आली वीजबाई..
हृदयाच्या स्पंदनांचा वाढला वेग..
आकाशात चमकली जेव्हा एक रेघ..

टप टप पडताना थेंब होती मोठे..
पावूस येता जोराचा नाणे झाले खोटे..
आता वाहे झुळूझुळू पाणी नाल्यातून..
आठवणी तरंगती कागदी होडयातून…
मन आणि पावसाचे नाते ताजे ताजे ..
पागोळीच्या पैंजणाचे थेंब कसे वाजे

राहतो गारवा आता इथे तुझ्याविना…
तुझ्या आठवांचा ठेवून खजिना…
पुन्हा ये ना जरा तुझी सर सर घेवून.
घटट मिठी मार ना रे धरतीला बिलगून..
तुझे आणि जमिनीचे नाते कसे भारी..
झेलते ग भूमी तुझ्या सगळ्याच सारी…

जातानाही तू जेव्हा जाशील निघून ..
पुन्हा परतायचे वचन देवून…
जाशील तेव्हा तुझे थेंब घेवून जाशील…
डोळ्यामध्ये आमच्या थेंब ठेवून जाशील…
तू येशील तू येशील
तुझी वाट आम्ही पाहू..
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…

स्पर्श तुझा…

स्पर्श तुझा…
व्हायच्या आधी… विजा अंगावर आल्यासारख्या येतात…
जणू तुझा गगनातील विरह त्यांना सहन होत नाही…
जमीन हि तापलेली…तिचा तुझा विरह संपण्याचे वेध लागलेत…
हळूहळू एक मृत्तिकेचा मधुर गंध सुटलाय… तुझ्या स्पर्शाने…

स्पर्श तुझा…
आता अलगद अलवार… रुजतोय….
तू नसूनही तू येणार …….तू येणार..
आणि असाच भिनणार अंगांगात…
चिंब चिंब करून…
पागोळीचे थेंब जसे राहतात लटकत लटकत
मनातल्या दिशा जशा जातात भटकत भटकत…

स्पर्श तुझा…
कोसळल्या धारांनी होतो…
घोंगावणा-या वा-यांनी होतो…
अलगद झोम्बणा-या गारव्याने होतो..
गारठलेल्या गात्रांना वाफाळलेल्या कॉफीने होतो…

स्पर्श तुझा आनंदात तसा
स्पर्श तुझा दु:खातही होतो…
आनंद द्विगुणीत करणारा होतो..
दु:ख ताजेतवाने करणारा होतो..

स्पर्श तुझा….
कधी तिच्यामार्फत होतो…
कधी तिच्या आठवणीतून होतो….

स्पर्श… म्हणजे हर्ष.. म्हणजे
जणू आपल्या नात्याचा परामर्श…

तू येतोस,

तू येतोस, तू जातोस…
तू दिसतोस. तू रुजतोस..
तू भिजवतोस… तू लाजवतोस.
तू चार महिने येतोस…. आणि
आठ महिने आठवतोस …
मोराला नाचवतोस
आम्हाला श्रावणात नेतोस…
सणांचा आरंभ करतोस..
येतोस गाजत…गाजत जातोस…
तरी सांगू…
धरतीला भेटून
तुही रुजतोस…
धरती जाते हिरवळीने सजून…
जसा वारा पानात शिरतो लाजून…

तो गेल्यावर …..

तो गेल्यावर …..
अजुनी दरवळतो वास मातीचा…
जमीन आणि पावसाच्या प्रीतीचा.
तो गेल्यावर ……
थेंब ओघळती तारांवरुनी…
स्पर्शात राहतो वारा अजुनी…
तो गेल्यावर …..
एक नितांत सुंदर हिरवळ
मनात पसरलेली..
आठवणींची लांब रांग
धुक्यावर पहुडलेली
तो गेल्यावर …..
तो यायची वाट बघत…
मन आतुरतेने वाट बघतं…
डोळ्यात पाऊस उभा राहतो
तो येईल अशी अशा असतेच रोज..
येतानाचा दिमाख नेहमीच नसेलही..
पण सरींची लय
त्याच्या लहरीपणासारखीच ..
पैसा खोटा पाऊस मोठा ….
या लहानपणाच्या गाण्यासारखीच…