खिरापत….

सगळ्याचीच खिरापत
झाली आहे आजकाल..
कुणीही येतो आणि खिरापतीसारखी
स्वतःची स्तुती करत बसतो..
कुणी भ्रमण ध्वनीतून खिरापत
वाटत संदेशांची..
का तर म्हणे मोफत संदेश आहेत…
कुणी असंख्य वेळ
शब्दांची खिरापत वाटत बसत..
का तर म्हणे…मोफत बोलणे आहे..

कुणी खोट्या हास्याची तर कुणी नकाश्रुंची
खिरापत वाटतच असत
रोजच्या मालिकांमधून…
संवाद तर असे असतात
जसे किलोवर मिळतात,
कुणी करतो चित्रपटाला ५० दिवस झाले
म्हणून आनंदाची उधळण,
खिरापत थोडक्यात ती हि पैशांची….
आणि नाती तर अशी कि
तिथेही व्याभिचारांची खिरापतच…

कुणाला काय तर कुणाला काय…
खिरापतीचे प्रत्येकाने दुकानच टाकले हाय..

कुणी नैसर्गिक आपत्ती आली कि ,
अपघात झाला कि
खिरापतीसारखी आश्वासने वाटतात,,
‘प्रसाद’ म्हणूनही साधी कुणाची
आश्वासनपूर्ती होत नाही…

कुणी आहेत पैसे म्हणून घेवून ठेवतो जमिनी
खिरापतीसारख्या…
मालमत्ता तेवढी करतात
खिरापतीसारखी…
काळा पैसा वापरून पांढरे कपडे घालण्याची हल्ली
प्रथाच झालीये,
समाजात वावरताना,
आत्मप्रौढी हि अशीच असते मिरवत
यांची खिरापतीसारखी..
समाजसेवा असते मात्र शून्य…

खिरापत त्या दारात मिळते,
ज्या दाराच्या आतमध्ये
देव असतो वसलेला..
हेच विसरून गेलो आहोत आपण..
आणि मग लक्षात आले कि अरेच्च्या
आपण ब-याच दिवसात तिथली
खिरापतच खाल्ली नाही…
देव तरी कसा भेटायला येणार
आपल्याला स्वताहून…
त्याचीही खिरापतीसारखी
आपण देवळच करून ठेवली आहेत…
त्यातून
खिरापतीसारखा पैसा कमावण्यासाठी………….
खिरापत….
आठवतेय का?

प्रीत तुझी ग..

प्रीत तुझी ग
मज जडली..
जीवन कळी
हि फुलली..
धुंद नशा
मजला आली..
बेभान होवुनी
रात्र गेली..
ध्यासात, भासात, श्वासात..
ता -यांनी चंद्राला, लाटांनी किना -याला…
किती निरोप धाडिले ग…

मिठी तुझी ती
मला बिलगली…
स्पंदने अशी हि…
रुंदावली
लाजून गाली
खळी पडली…
सैरभर नजर
कुठे घुटमळली
प्रीतीत, मिठीत, श्रुतीत…
तालानी सुराला, श्वासांनी उराला…
कसे अनामिक छेडले ग…

क्षण ते आसक्त..
नेत्रांचे आरक्त..
प्राशिला जो गंध..
तू मुक्त मी मुक्त
क्षणात, स्पर्शात, पर्वात
मात्रानी वृत्ताला, नेत्रांनी चित्ताला…
अन तूच मला उलगडले ग…..

तेव्हाही…!

तू मला सोडून गेलीस न..
तेव्हा मला दिसली होती तगमग
तुझ्याच मनाची…
पापण्यासकट कापरं भरलेल्या
तुझ्या लोचनांची…

चेह-यावर होते हसू खोटे…
अन अश्रुना ‘पदर’ मागे लोटे
आरक्त साचले डोळ्यात…
जपून ठेवलेस न मला तू
मनातल्या तळ्यात…

मी जेव्हा निघून गेलो तिथून…
तेव्हा आणलेस मला पुन्हा आठवणीतून…
ढसा ढसा रडलीसच… अश्रू मोकळे करून…
आरक्त हि अजून लालभडक झाले..
अश्रुनी पदर भिजून गेला…….
चेह -यावर होते खरे भाव…

पापणी तर थरथरतच नव्हती आता…
मनातल वादळ तसच घोंघावत होत…

तू मला सोडून गेलीस न… तेव्हाही…
अन मी जेव्हा निघून गेलो तिथून तेव्हाही…

हृदयाचं घर..!!

कधी गेलं, कसं गेलं..कुठं गेलं बरं.
स्पंदनांच्यासह माझ्या हृदयाचं घर..
डाव मांडुनीया तू अडीच अक्षरांचा
जीवाला लावलीस अनोखी हुरहूर..

स्वप्नातून माझ्या जागा झालो खरोखरी
प्रत्यक्षात आली माझी स्वप्नातली परी…
आज नाही लागे डोळा माझ्या डोळीयांना ..
नजर खिळून राही टक्क भाळावर..

झोपेतच होतो इकडे, झोपेत तिकडे..
जळी, स्थळी, पाषाणी असे रूप तुझे खडे..
आरशात पाहता मी माझा चेहरा
तुझ्या गालाची खळी येते माझ्या गालावर..

भेट होता होते कसे काळीज सशाचे..
कोणी बोलायचे? अन उसासे श्वासांचे ..
नजरेला भिडे न नजर कुणाची..
अव्यक्त भावना व्हायची लज्जेनेच चूर..

जातानाही आणाभाका..पुढच्या भेटीच्या..
पुढच्या भेटीत नक्की बोलके होण्याच्या..
राहतो मी आता त्या स्वप्नांपासून दूर
हृदयाला मिळाले एक हक्काचे घर..!!

नभी आले भरून.

नभी आले भरून…वीज आभाळा चिरून..
गेला पाऊस रुतून.. भूमी गेली हो भिजून…

सळसळ करू लागे…..वारा पानात शिरून..
मोर आनंदाने नाचे बघ थुईथुई करून..

तुझी चाहूल लागता… मन भिजले आतून..
मंद सुवास आला..काही शिजले आतून…

आता रेंगाळतो पाऊस..घराच्या पागोळीमधून
वाट हळूच काढतो आपल्या दोघांच्या मधून..!

ओला ओला..

अश्रू होते का पावूस हे ओळखणेही होते अवघड..
इतकी झाली होती आतून मनाची पडझड…
हसू गालावर ठेवत..तू दिलास निरोप मला…
आजही रुमालात तो आहे तसाच ओला ओला

गनिमी..!

काय सांगू तुला कसे…आठवले मनी मी..
स्पंदनानी खेळले किती कावे गनिमी…

आभास व्हायचा तुझा तेव्हा..वाटायचे…
तारेही किती प्रकाशमान वाटायचे….

लोचनी थरथर त्या व्हायची…
अश्रूंची तेव्हा कशी पळापळ व्हायची..

भार तुजला मग अश्रूंचेही व्हायचे..
गालास जेव्हा ते स्पर्शून जायचे..

तुजलाही असेच काहीसे असेल भासले…
जे मला स्पंदनांच्या गनिमी काव्याने दिसले…