तुझीच..

आभाळभर ओलं…
ह्रदयात खोल..
सर तुझीच….

बेभान वारा..
देहभान सारा..
सय तुझीच..

राहीलेला गारवा
कुणी छेडी मारवा..
सल तुझीच..

– अखिल जोशी

पाऊस

तू असताना “कळतो” पाऊस
तू नसताना “छळतो” पाऊस

निरोप घेऊन मागे वळता
गालावर ओघळतो पाऊस

थेंब झेलती फुले सुगंधी
पानावर सळसळतो पाऊस

दूर डोंगरावरी सयींच्या
धबाधबा कोसळतो पाऊस

चाल ऐकुनी चाहूल देतो
पैंजणात घुटमळतो पाऊस

तुझा रेशमी स्पर्श होऊनी
क्षणामध्ये विरघळतो पाऊस

तुला बिलगता वीज होऊनी
माझ्यावर कोसळतो पाऊस

हट्ट

लवकर पाऊस यावा असा माझा  हट्ट नाही
तसं माझं पावसाशी नातं काही घट्ट नाही

उजाड झालाय उजेड, काळोखही मिट्ट नाही
उनाड वारा एसीत बंद, हौस माझी फिट्ट नाही

जून

पावसा ये कमिंग सून
अस म्हणत आला जून

कौलाने पाहिले चपापून
झाडून घेऊ आहे तो उन

लहरी जरी आहे मान्सून
वाट पाहतो मनापासून. .

सरी तुझ्यातून माझ्यातून..
तशाच कागदी होडीतून

सूर्यच गेलाय पार वितळून
शोधतोय ढगांची एखादी खुण

उदास उदास मनातून.
हिरवी लहर एक आतून

तुझ्यासाठी ठेवली जपून.
एक जुनी आवडती धून ..

रोज रोज वाटते उठून.
आजतरी येशील, घेशील बसून.

तुझ्यातले माझ्यातले.
क्षण हसरे घेशील साठवून …

येशील ना पुन्हा परतून.….
नाहीतर निघून जाईल जून

– अखिल

ए पावसा

ए पावसा ,
आलाच आहेस तर ये…
जरा बसून घे.. तुझ्यासाठी मस्त
गरमागरम आल्याचा चहा टाकते…

पावूस—
‘नको… मी असा कुणाच्या घरात बिरात जात नाही..
मुक्काम तर अजिबात करत नाही कुणाच्या घरात…
मला यायचा असत तुमच्या मनात..
घरात येऊन काय करू?
मनात आलो कि तुरटी सारखा मी फिरतो
तुमच्या मनातून…
कुठल्याही प्रवास कंपनी अशी सहल आयोजित करत नसेल
अशा प्रदेशातून मनमुराद फिरतो..
ढवळून निघते तुमचे मन..
कधी सुख होते द्विगुणीत…
कधी दु:ख होते ताजे… पण वाटते हलके नक्कीच…

तर असा माझा प्रवास मनातून मनातला…
कशाला उगाच घरी मुक्कामाला बोलावता?
ज्या घराची दारं नसतात बहुतांशी उघडी…
खिडक्या वारा यावा म्हणूनच उघडल्या जातात क्वचित…
नाहीतर डास येतात म्हणून बंदच असतात
आतमध्ये गुड नाईट चा सुगंध घेत तुम्ही झोपी जाता
बाहेरच्या रातराणीचा सुवास सोडून..!!

नक्कीच कळतंय मला
तुमच्या मनात सलतात सगळ्या गोष्टी…
एक काम करा..

मला तुमच्या घरात न बोलावता….
तुम्हीच मला भेटायला बाहेर या…

मनसोक्त भिजा. आनंद लुटा
या क्षणभंगुर जीवनात.. असे क्षण निर्माण करा…
कि तुम्हाला आयुष्य हिमालयासारखा वाटेल…

हे सगळ करत असताना
जरा सामाजिक जाणीव जागृत ठेवा…
इकडे तिकडे बाटल्या पडतील…
आणि त्या बाटल्यांमुळे तुम्ही पडाल
असे करू नका..
कारण बाटलीतल्या धुंदिपेक्षा…
निसर्गातील धुंदी कितीतरी चांगली आहे….
जगण्याची उमेद देणारी आहे..
जगण्याची उमेद देणारी आहे..