आठवतंय?

आठवतंय?
घरातली ओटी..
माजघर… आणि माजघरातील जाळीदार कपाट?
त्यात ठेवलेले दुध नि दही
भूक लागल्यावर खाल्लेले दही नि पोहे…?
सुट्टीमध्ये उन्हा तान्हात गल्लीबोळातून…
खेळलेले आणि आता खोलाम्बालेले खेळ..
विटी दांडू, आट्यापाट्या अन क्रिकेट..
लग्गोरी, डब्बा ऐसपैस न ढप-गोटी
एखाद्यानं नेम नाही म्हणून त्याच्यावर आलेली पिदी (काढणी)
आपल्याच झाडावर दगड मारून खाल्लेल्या आंबट कच्च्या कै -या
दमलो भागलो तरी दुपारची न घेतलेली विश्रांती…
आजीच्या हाताचा बरोबर ३ वाजता होणारा चहा?
कि अभ्यास नाही केला म्हणून मिळणारा धपाटा…
विमान उडवताना कौलावर अडकलेले विमान
ते काठीने काढतानाची आपली कसरत,
हातात सेल घेवून बोंब असल्याचे भासवत केलेले लुटूपुटुचे युद्ध..
खेळताना वेळेची असायची कुठे शुद्ध..
carrom असेल, पत्ते असतील, बैठे खेळ सगळे,
उन्हाळ्याच्या सुट्टीतील गप्पांचे अड्डे..
आठवतंय का तुम्हाला मधली सुट्टी… शाळेच्या मैदानात
सगळ ओझ झुगारून खेळलेली पळापळी, पकडापकडी ?
मोठे होते गेलो तशी शाळाही सुटली..
गल्लीतल्या दोस्तांची मैत्रीही सुटली..
खूप दूर गेले सगळे, गल्लीही नाहीशी झाली..
संगतीला पैसा अडका, खरी श्रीमंती नाहीशी झाली..
आठवतंय?
आठवत असेल तर तुमचा बालपण तुम्हाला अजून खुणावत असेल नक्कीच…
निसटून गेलेल्या क्षणांना हृदयाचे कोंदण मिळाले असेल नक्कीच..