तू सांग मला

तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय?
विश्वासच मजबूत जाळ कि मृगजळाची पातळ साय?

तू सांग मला समजावून प्रेम होत तरी कसं?
खरच स्पंदनांच्या लहरी उमटतात कि मनच होत वेडपीस

तू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं?
अधीर होतात गात्र गात्र का नुसताच साचतं आभासाच तळ?

तू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात?
आपल्यातल्या विश्वासात? विश्वासातल्या श्वासात?
श्वासातल्या माझ्यात? माझ्यातल्या तुझ्यात?

Advertisements

डोंबारी

कालच पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली
काहीतरी व्यायाम हवा ना?
आणि हल्ली तसा कुठलाही संकल्प सोडायला काय आपण काहीही सोडतो…
पण त्याची अंमलबजावणी करताना खूप प्रयास करावे लागतात..
तर घराबाहेर पडलो आणि लगेच चौक लागला
तिथे एक जुनी लोककला म्हणू आपण,
पण डोंबारी आला होता, त्याची तयारी चालू होती,
तीन खांबी बांबू दोन्ही बाजूना लावून त्यावर दोरी टांगून तयार होती….
ढोल वाजायला लागला तशी गर्दी वाढली… लहान मुलगी आधी रस्त्यावर..
उद्या मारून लागली, कोलांट्या उडया मारू लागली.. नंतर ती त्या तीन खांबी बांबूवर लीलया चढली
वय साधारण ४ ते ५ वर्ष असेल… दोरीवर चढल्यावर तिला तोल सांभाळायला बांबू तिच्या गळ्यात जी दोरी होती त्यात अडकवला..
नि त्या ढोलाच्या तालावर…. लीलया दोरीवर चालत होती.. एक दोन वेळा चालल्यानंतर.. पुन्हा ती मध्ये आली.. आणि पायाने जोरजोरात दोरी
हलवू लागली.. तिच्या या हरकती बघून मी हि क्षणभर स्तब्ध झालो…
मला ऑलिम्पिक चाम्प नादिया ची आठवण आली..
या डोम्बार्यांचे पोटच या कलेवर आधारित आहे…खूप दिवसांनी असा खेळ बघितला डोम्बारीचा…
क्षणभर लहान झालो…….. मनात असा विचार आला
अरे लीलया दोरीवर चालणाऱ्या या मुलीचे नंतर काय होत असेल?
तिचे शिक्षण तर सोडाच पण उदार्निर्वाहासाठीच असे खेळ करावे लागत असतील.
मग या खेळला तिने तिचे ध्येयच का बनवू नये..
सरकार अशा मुलांना शोधून काढून त्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यास नाकाम ठरत आहे…
जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप खेळामधून जात नाही तोपर्यंत भारतीय खेळला किवा खेळाडूना
मोठ्या प्रमाणावर……. सुवर्ण पदक मिळणार नाहीत…
आपण आपले एक सुवर्ण पदक मिळाले कि त्याचेच कौतुक करत बसतो..
त्यात आपण प्राविण्य मिळवून सातत्य दाखविले पाहिजे असे खेळाडू आणि खेलासाठीच्या
सुविधा आणि प्रशिक्षांची फळी उभारली पाहिजे….
जिथे गरज आहे तिथे उदासीनता दाखवली जात आहे…
आणि नको तेच वाद चावून चावून चिघळले जात आहे
आणि त्याच भोवती आपल्याला गुंडाळून ठेवले जात आहे…
आपलीही नागरिक म्हणून काही भूमिका आहे….
आयुष्यात एका तरी मुलाला / मुलीला कुठल्याही प्रकारच्या खेळासाठी
लागेल ते… सहकार्य करण्याची… मी मनोकामना केली आहे . कालच….
त्यासाठी मी माझ्या हितसंबंध… माझ्या परीने होईल ती आर्थिक मदत करण्यास तयार आहे…

जिद्द असावी अशी जिला नसावी हद्द.
नियती हि व्हावी त्या ठिकाणी स्तब्ध.

एक चांदण्या मनाला

एक चांदण्या मनाला होती चंद्रकोराची ग प्रीत,
चंद्रकोराच्या रुपाची अनोखी होती रीत…

रोज अनोखे रूप, रोज अनोखे लावण्य,
त्याच्यापुढे ‘तिला’ होते सारे – सारे नगण्य

त्याची पौर्णिमा झालेली त्याने भरून पहिली..
प्रकाशाची मळवट तिने माथिया लाविली..

रूप खालावत गेले, तसे काहूर दाटले,
एक ‘सावित्रीचे’ भाल असे पांढरे पडले

तरी प्रेमाची ‘संगत’ हर एक राती होती..
आता ‘त्याचे-तिचे’ प्रेम शत तारकांच्या ओठी…

परीघ

परीघामध्ये फुले पसरती…
परिघाबाहेर फांद्या डोलती…
कधी ऐकावे कान देवून…
वर्तुळातली त्रिज्या बोलती…

मुक्त आकाशी विरहून थकती,
अन फांदीवरती बसती,
विश्वासाचा धरून धागा…
पक्षी आनंदाने किलबिलती…

‘त्या’ क्षणाचे जगणे 

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चौकटीच्या इवल्याशा फटीतून कवडसा अंधारातून झगमगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

नयनी अश्रू, ओठी हास्य, खेळ असा आननी रंगतो..
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चंद्र-चांदण्या दिसती जेव्हा पुनवेचा दिन उगवतो..
”त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

अनुत्तरीत

तंत्र ज्ञानातील प्रगती खरच अवाक करणारी आहे.
क्षणार्धात दुसर्याशी संपर्क साधू शकणारा मोबाईल
किवा तत्काळ निरोप पोचविणारा त्यातील संदेश वाहक किवा
E-mail सेवा …
सर्व काही क्षणार्धात…
पण आपण जर जरासं डोकावलं पूर्वार्धात तर?
कारण मानवानेच तंत्रज्ञान प्रगत केल..
पण दुसर एक तंत्रज्ञान जे कुणी निर्माण केलं,
त्याचा निर्माता कोण हे एक कोड आहे..
आपण कौतुक करतो एखादा कपडा शिवल्यावर त्या शिंप्याचे.
पण अक्ख्या अंगावर एकही शिवण नसलेली कातडी पांघरणारा तो शिंपी कोण?
इवल्याशा मेंदूतून असंख्य आदेश देणारी रचना व शरीरावर कुठेही स्पर्श / दुखापत झाली
तरी प्रत्युत्तर संदेश देणारा कोण?
१० मेगापिक्सल किवा १२ मेगापिक्सल क्यामेराचे आपण कौतुक करतो
कधी लाखो किलोमीटर अंतरावरील चंद्र, सूर्य किवा तारे बघू शकणार्या डोळ्यांचा मेगा पिक्सल किती असेल याचा विचार केला आपण?
असं सगळ आहे.
विचार करायला गेलो कि मन थक्क होतं,
अन काही प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत राहतात….

शब्द फुले

शब्द फुले तू वाहिलीस…
त्या फुलांची यातनाही तू पाहिलीस…
ओल्या जखमा जितक्या जास्त…
तितकी संवेदना राहील तंदुरुस्त…

संवेदना जागृत तर
आपणही राहू जिवंत…
शरीराने तर प्रत्येक जण जिवंत राहतो…
मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…