सारखे

तसा हल्ली दुष्काळच पडलाय या अंतरी
अश्रूही भासतात हल्ली पावसासारखे

तेव्हाची गोष्ट वेगळीच होती
शिशिरात हि वाटायचे वसंतासारखे

जेव्हा तुटले सगळे ऋणानुबंध
वाटले कुणीतरी नाळ तोडल्यासारखे

वा-याच्या लाटेवर जेव्हा येते आठवण
तेव्हा कुठे वाटले उजाडल्यासारखे

एकूणच हास्य अन अश्रू साथ होते
तेव्हा कुठे व्हायचे गहिवरल्या सारखे

दु:खासोबत सुखाचे होते धागे प्रीतीचे
कुणी लांब केले तरी व्हायचे विरल्यासारखे

आता काय

रिते रिते होवून जाते जगणे..
रित्या ओंजळीत आता काय मागणे..

कुणी करावा आभास कुणी द्यावा दिलासा..
रित्या जिंदगीस आता काय सांगणे..

कुणी न्यावे सूर ताल, कुणी उचलावे शब्दांना..
रित्या मैफिलीत आता काय गावे गाणे..

कुणी नसावे मनी कुणी नसावे .. हृदयी..
रित्या दृष्टीत आता काय स्वप्नं पाहणे..

दोन अश्रू त्यांच्यासाठी...

दोन अश्रू त्यांच्यासाठी…
ज्यांनी दिला कवितेतून संदेश..
मनालाही दगड बनायला सांगितले..

दोन अश्रू त्यांच्यासाठी…
स्नेह्गंगा, मृद्गंधा, द्रुपद, जातक,
विरूपिका यांची अष्ट दर्शने दाखविली..
त्या व्यक्तीसाठी..

दोन अश्रू त्यांच्यासाठी…
यांत्रावातर, तेच ते, ती जनता अमर आहे..
त्यांची महानता कळण्यासाठी
इतुकी झलक पुरेशी आहे..

दोन अश्रू त्यांच्यासाठी…
ज्यांनी दाखविला ‘ एटू लोकांचा देश’
‘अडम तडम’ लिहित लिहित..
‘राणीच्या बागे’ त एकदा काय झाले..
शब्दांना देवूनी मान फुले फुलविली ज्यांनी..

दोन अश्रू त्यांच्यासाठी…विंदांच्या कवितेसाठी..
कवितेतल्या ‘ज्ञानपीठासाठी..’
दोन अश्रू….

पण कुणी समजले असते मला तर

कुणी समजले असते मला तर
आभाळ पुन्हा दाटले असते..वीज पुन्हा कडाडली असती..
पाचोळ्यावर थेंब पडून.. त्यातून पालवी पुन्हा फुटली असती..
थेंब थेंब अलगद झेलून… जमीन खुशीत निजली असती..

पावूस आलाच असता तर आनंदाचा पूर हि आला असता..
आठवणी, क्षण, झुळूक वा-याची पटकन देवून गेला असता..
पावूस पडून गेल्यावर मग.. पाणी निपचित पडले असते..
तारांवरून थेंब अलगद हळू हळू निथळले असते..

गार गार स्पर्श हवेचा.. जरासा झोंबून गेला असता..
कुंतल गाली पसरून येत.. चेहरा जरासा लाजला असता..
प्रीत रस ओथंबून येता ओठही मग हसले असते..
झुकून पापणी कटाक्षानेही . मजला हळूच खुणावले असते..

पण कुणी समजले असते मला तर ना

अशा किती सांज गेल्या.. कल्पना अशा कित्येक रमल्या..
कुणी झोकून द्यावे इतुके.. मी कुणा सांगितलेच नाही..
कुणी समजलेही नाही.. गुज माझ्या मनीचे…
मनातून वाहणा-या त्या आसवांच्या नदीचे..

रंग

रंग..
रंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..
मुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..

कधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..
त्याची lable जाती – धर्माला लावली जातात..
त्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग
वाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..
मग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..
इतुके अंध होतो आपण.. या रंगाच्या भेदाने. जो करतो आपणच.. द्वेषाच्या छेदाने

रंग दुखाचे, रंग सुखाचे… रंग व्यक्तीचे. रंग शक्तीचे..
रंग एकोप्याचे, रंग विरहाचे.. रंग क्लुप्तीचे, रंग युक्तीचे..
रंग राजकारणाचे.. रंग राजकीय पक्षांचे..अंतरंग त्यातील नेत्यांचे..
भ्रष्टाचाराला काळा रंग चढवणा-या पांढ-या वेशातील चोरांचे..

रंग असेही रंग तसेही..
जंगलात दुडू दुडू धावणारे ससेही..
आयुष्य असे रंगुनी जावे..
जसे मुक्त विरहती आकाशी पक्षांचे थवे
असावीत अशी पाने आयुष्यात..
जशी रंगांची मुक्त उधळण होते क्षितिजात..