दे अजून काही

दिलेस मुक्त चांदणे दे अजून काही…
मिठीत बंद लोचने दे अजून काही 

मौनात अर्थ लागले चाचपून काही…
मिटून सर्व बंधने दे अजून काही…

लाजून अंग चोरत मोहरून जाई 
प्राशून सर्व चुंबने दे अजून काही 

वेचून फुल माळता तू सजून जाई 
सोडून केस मोकळे दे अजून काही 

होवून स्पर्श साजरे बावरून जाई 
वेढून घट्ट हात हे दे अजून काही

होता..

मोग-याचा तो सुगंधी वार होता..
त्या क्षणांचा तोच साक्षीदार होता…

मौन सारे लोचनांच्या पार होता…
हा तुझ्यासाठी जणू होकार होता…

सांडल्या त्या पाकळ्यांचा भार होता…
भार होता तो खरा आधार होता..

दु:ख सारे आसवांच्या पार होता…
भंगल्या स्वप्नात त्यांचा सार होता…

यातनांचा हा खुला बाजार होता…
वेदनांचा खास हा शेजार होता…

खरा..

गढूळ झाली नाती…राहिले न काही हाती….
मातीने दिला जन्म झाली जन्मताच माती…
कुठून उभ्या राहिल्या अचानक जातीपातीच्या भिंती….
भेदभाव ना खंत मला ती कशास वैर तू चिंती…
जगू लागला “भाव” वाहिला माणुसकीचा झरा..
जगेल वागेल सांगेल “माणूस” तोचि असेल खरा..

मारवा

मनी माझ्या चांदवा चालला तुझ्याच गावा …
तुझ्या सावलीमध्ये…चमकतो जसा काजवा.
पुन्हा एकदा सखे झुळूक देते गुलाबी हवा..
हवा सोबतीला सखे तो मंद मंद मारवा

तिने काळीज देताना

तिने काळीज देताना… उसासे. मंद टाकावे 
रित्या ओंजळीला भावनांचे भार ते द्यावे..

तुझ्या त्या… लोचनांनी तीर वर्मीच सोडावे…
पुन्हा जन्मून जखमा प्रेम त्यातून सांडावे..

लिहिले काय भाळी या कुणा मी योग्य पुसावे..
तुझ्या रेषात हाताच्या मी माझे भाग्य शोधावे.

तुझे ते बोलणे लाडे तुझे लटकेच ते रुसवे.
कधी ते स्वप्न भासावे.. कधी सत्यात उतरावे..

तुझ्या केसात गंधांचे..कसे गजरे मी माळावे 
जणू गंधाने…गंधाला..सुगंधी गंध वाटावे 

ओठांचे बहाणे. कसे… ओठात झेलावे..
जणू बेहोष होताना.. जरासे कैफ गोठावे 

तुझ्या मिठीत मिळती रे मला ते सर्द ओलावे..
मला वाटे आता सा-या क्षणांनी धुंद पिघळावे 

कधी थांबू नये आता.. प्रवासा प्रीतीच्या जावे..
वळणावरी कुठल्या तरी वळणास बिलगावे 

दिशा दाही… तरी कुठल्यातरी दिशेस हरवावे
दरीच्या खोल कुशीत स्वत:चे पाय पसरावे..

हललेही नाही ओठ तरीही केले कुणी कांगावे.
शब्द नाही बाहेर पडले.. धाडले कुणी सांगावे

आरसा

तू आरसा तसा नेहमीचा…
समोर आलास कि ओळख देतोस 
माझेच अंतरंग दाखवतोस मला 
माझ्यातले बरेच काही स्वताला घेतोस 
दाखवत नाहीस काही घेतल्यासारखे 
तडे जात नाहीत तोवर तुला….
आमची घुसमट… आमचाच राग…. 
निघतो तुझ्या अंगावर आणि मग.
होतात तुझे तुकडे हजार 
तरीही प्रत्येक तुकड्यातून तू 
माझे प्रतिबिंब दाखवतोसाच कि…
इतकं प्रेम.. खरच … 
कुणी … कुणावर करत नसावं ..