समिंद्राला उधाण.. लाटा सुटती बेफाट….
तुझ नसणं
पाहिले तुला ज्या नजरेने…
कधी कधी…
कधी कधी ….
तू वाटतेस मजला सूर छेडलेले…
अंतरात माझ्या या..थेट भिडलेले…
कधी कधी…
तू सांगतेस मजला शब्द गुंफलेले..
शब्दात गूढ होते अर्थ दडलेले…
कधी कधी
तू शोधतेस मजला. दूर दूर जेथे…
गवसेन का मी ग तुज आरपार तेथे..
कधी कधी…
तू संग न जरी या आसपास असशी…
डोळे मिटूनही मज स्पष्ट स्पष्ट दिसशी …
कधी कधी…
तू जे दिले ते मी… जपले उरात तैसे…
उमले मनात आता विरहाचे फुल जैसे
काहीतरीच होते…
बोलायचे एक…बोलून जातो काही…
भावनांचे असे हे काहीतरीच होते…
हलके करू म्हणालो… दु:ख साठलेले
शोधूनी ओंजळीला भार उरीच होते…
सांभाळ तू स्वत:ला …सुटला मंद वारा
तुझिया बटा छेडणे हे …स्वाभाविकच होते…
हे थेंब पावसाळी…शिरती मनात सहजी…
तू लज्जेत चिंब न्हाणे हे साहजिकच होते.
वचने
वचने दिली मला ती लवचिक का रे नव्हती…
विखरून सारी धरती… एकाकी झाली माती…!!!
मन
मन मनातले .. शोधते रे तळे…
मंद वा-यावरी बोलती हि फुले
कस्तुरी गंध हा आला कसा तो कळेना…
मोहुनी डोलती प्राणातले हे झुले
“झिंगणे”…
सावरणे म्हणजे तुझाच आधार शोधणे…
तुटलेल्या जीवाला…तुझ्या स्मृतीने बांधणे…
तू संग ना…तरी रंगले चांदणे…
मृदू मुलायम तरल संथ..गोंदणे…
राहिले तसेच स्वप्न ना उरले जगणे…
मागिले उगाच जे ना देता आले मागणे…
सोडूनी पाश सारे..बरे नव्हे हे वागणे…
तुझ्या वाटेवरी तेल नयनी जगणे…
वळूनी पुन्हा पाहतो वळणाकृती ती रिंगणे…
अनुभवावे तुझ्यासवे मद्यापरी ते “झिंगणे”…
आले कसे कोठुनी
आले कसे कोठुनी.. मेघ हे दाटुनी
येताना हिरवाईला थेंब थेंब वाटुनी…
मृद्गंध हा दरवळला…पाकळ्यात कसा विरघळला
घ्यावे क्षणास आता हृदयात साठ्वूनी…
सापेक्ष
आभास पालवीचे… नव्हते खरे कधीच…
ओळखिले नव्हते त्या फांदीने कधीच…
तो वृक्ष रुक्ष झाला… घरटे गवाक्ष झाले..
जगणे अधांतरीचे… कसे सापेक्ष झाले…
थट्टा
ताजी ताजी कविता म्हणे करून दे तू…
अशी तशी कशी असेल… करून दे तू..
करून दिली तर म्हणे… आत्ताच केलीस का?
अस विचारून तू माझी थट्टा केलीस का?