श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ

तुमच्यामुळे आला आमच्या  जीवनाला अर्थ…
 
आसावलो भेटीसाठी…… विसावलो तुझ्या मठी 
तुझ्या दर्शनासाठी …. वेडावलो भक्तीसाठी…..   
नसे यात दुसरा कुठलाही स्वार्थ….!! 
 
श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ

तुमच्यामुळे आला आमच्या जीवनाला अर्थ…
कैसे झाले अभागी …मातले हे दैत्य जगी… 
हात जोडूनी विनवितो …प्रकटावे तुम्ही युगी…
सांगा तुम्ही सर्वांसी आहे कसा परमार्थ…!! 
 
श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ

तुमच्यामुळे आला आमच्या  जीवनाला अर्थ…

सांग ना….

सांग ना
ठेवू कसे ओझे असे
पापणीचे थरथरणे जसे
केसात माळूनी फुल सुगंधी
गंध लाजले जसे
होते असे का हे सांग ना

 
भोळे असे मन हे दिसे
अल्लड अवखळ होई असे
बंध तोडूनी, धुंद होवुनी
वा-यावरती बसे
होते असे का हे सांग ना
 
चिंब कसे हे थेंब असे..
निथळून गाली जणू आरसे
ओठात माळूनी शब्द जणू
डोळ्यातुनी बोलले..
होते असे का हे सांग ना….

पाऊस २

सांजवेळी कातरवेळी 

असा कसा बिथरला पाऊस..
दूर राहिले  मेघ रिक्त ते…
असा कसा बरसला पाऊस..

थेंब थेंब मिळून धारांनी…
पानापानात घरटे केले…
भिजून गेले चिंब पक्षी 
सारे ते  थरथरते झाले…

डोंगर द-यात एकच गंध..
जणू कुपीतून अत्तर यावे..
या भूमीचे अन नभाचे…
मर्मबंध चिरंतर व्हावे…

समीप येत पाऊस ओला
मनात पटकन झिरपून जातो…
पाकळ्यातले परागकण ते 
भुंगा होऊन वेचून  जातो…

येता पाऊस…येतो पाऊस…
दोन्ही हाता देतो पाऊस…
गजा आडुनी वीज दिसावी..
तसा चमकुनी येतो पाऊस..

वीज घुसावी अंतरात या…
अशी तुझ्या प्रीतीची किमया…
वरुनी पाऊस चेतवतो  रे…
धुंद धुंद भिजलेली काया….


पाऊस १

पाऊस १ 

तुला सांगितलं होतं वेळेवर यायला…

तुला सांगितला होतं.मुसळधार पडायला…
तू आला नाहीसच…
अरे अंगाची काहिली होतेय…
मन तर कोरंच झालाय… कागदासारखा..
कागदावरून आठवल…
शब्दांच मळभ मनात साठवल…
तेव्हा बाहेर जरास डोकावून बघितलं…
अरे तू ही भरून राहिला आहेस कि… जरासा गारवा निर्माण झालाय कि…
ज्या दिशेने येतोस…तिथूनच यायला लागला आहेस…
लवकर ये… संध्याकाळची वेळ चुकवत नाहीस म्हणा तू…
पत्र्यांवर, कौलांवर साठलेला पाचोळा हळू हळू रस्त्यावर पडू लागलाय… 
पक्षांची भिरभिर सुरु झालीय…
तू आलास न कि कित्ती मज्जा येईल सांगू…
लहान मुलं धावून घराबाहेर पडतील..
तुझ्या धारातून मनसोक्त भिजतीलंच 
पण मोठी माणसंही लहान होतील..
चिंब चिंब भिजायला आतुर होतील..
अंग पुसून जरा टीपोयवर पाय पसरून बसू नाहीतोच 
वाफाळता चहा आणि गरम गरम कांदा भजी…  हजर असेल..
बाहेर तू पडत असशील अजूनही…
पागोळ्यातून रमत गमत राहशील अजूनही…
तुझा एकसंथ आवाज….
विजांच्या गडगडतात.. भजी पचेल.. चहा रीचेल…
शरीराचाच नाही पण मनाचाही स्नान होईल सचैल..
असा तसा नसतोसच  तू कधी…
नेहमीसारखा भन्नाट असतोस..
पावसाला कितीही महिने चालू राहिला तरी
पहिला येतोस तेव्हाच घर करतोस मनात…
बघ नुसता तू येणार म्हणून मनातील शब्दांचे मळभ फुटलं..
आणि माझा कोरा कागद भारालासुद्धा…
ये पावसा  ये…
धिंगाणा घालत ये…
अंगणी भिजत ये..
मनात रुजत ये…
भन्नाट वा-यासवे  ये..
सुसाट थेंबासवे ये…

मी

मी भेद पाहिला नाही.. 
मी खेद मानिला नाही.. 
यत्न यातना दोन्ही
मी देव शोधिला नाही… 


मी एक एकटा दोन्ही….
मी दान सांडले नाही…

हरता हरता हुकुमाचे 
मी पान मांडले नाही…

मी शोधीत बसलो नाही…
मी कुणास दिसलो नाही..
तो एकच वियोग होता 
मी जेव्हा हसलो नाही..

मी वादळ झालो नाही.. 
मी शांतही झालो नाही…
घोंघावत राहून सुद्धा 
मी कधी निनादलो नाही…

आताही कधी पाहावे
मी मुळीच उमगत नाही…
मलाच नाही, सगळ्या 
जगास समजत नाही…