भलत्या सलत्या वेळी

भलत्या सलत्या वेळी कधीही दाटून आलं
तरी बेल वाजवत नाही ते मळभ
पावसाचे भास मात्र देऊन जाते

भलत्या सलत्या वेळी कधीही आला
तरी बेल वाजवत नाही तो पाऊस
भिजवून मात्र जातो

भलत्या सलत्या वेळी कधीही आली
तरी बेल वाजवत नाही ती तुझी आठवण
भूतकाळ मात्र जागवते

भलतं “सलतं” तेव्हा कधीही येतो 
तरी बेल वाजवत नाही तो राग…
किटली मात्र गरम करून जातो

भलत्या सलत्या वेळी डोळ्यात आला 
तरी बेल वाजवत नहि… तो अश्रू
रडवून मात्र जातो 

भलत्या सलत्या वेळी कधीही येतात…
तरी बेल वाजवत नाहीत ती तुझी स्वप्न 
झोप मात्र उडवतात

Advertisements

हृदयाचं घर

कधी गेलं, कसं गेलं..कुठं गेलं बरं.
स्पंदनांच्यासह माझ्या हृदयाचं घर..
डाव मांडुनीया तू अडीच अक्षरांचा
जीवाला लावलीस अनोखी हुरहूर..

स्वप्नातून माझ्या जागा झालो खरोखरी
प्रत्यक्षात आली माझी स्वप्नातली परी…
आज नाही लागे डोळा माझ्या डोळीयांना ..
नजर खिळून राही टक्क भाळावर..

झोपेतच होतो इकडे, झोपेत तिकडे..
जळी, स्थळी, पाषाणी असे रूप तुझे खडे..
आरशात पाहता मी माझा चेहरा
तुझ्या गालाची खळी येते माझ्या गालावर..

भेट होता होते कसे काळीज सशाचे..
कोणी बोलायचे? अन उसासे श्वासांचे ..
नजरेला भिडे न नजर कुणाची..
अव्यक्त भावना व्हायची लज्जेनेच चूर..

जातानाही आणाभाका..पुढच्या भेटीच्या..
पुढच्या भेटीत नक्की बोलके होण्याच्या..
राहतो मी आता त्या स्वप्नांपासून दूर
हृदयाला मिळाले एक हक्काचे घर..!!

सांग सखे सांग

सांग सखे सांग … सांग सखे सांग
ओठ काही बोलती तू डोळ्यातुनी सांग

कधी तुझ्या मनी असा फुलला पिसारा…
कधी तुझ्या मनामध्ये वाहिला का वारा..
सांग सखे सांग … सांग सखे सांग
मन काही बोलू पाहे स्पंदनांनि सांग

दूर झालो कधी तेव्हा दाटले का मेघ
काळजीची उमटली का काळजात रेघ
सांग सखे सांग … सांग सखे सांग
कधी माझ्या आठवांनी ओळी झाली का
तुझ्या पापण्यांची रांग ?

सांग सखे सांग … सांग सखे सांग

गेले…-

तू गेल्यावर तुझ्या पावलांकडे बघणारे डोळे..
झाले तुझ्या आठवणीने किंचित ओले..
आलेले सर्व ऋतू पाहुनी मजला ऐसे..
ते हि तसेच ओल्या पापण्यांनी परती गेले…-

तू…

आस ध्यास श्वास भास आभास तू…
मंद कळ्यांचा गंधभरला श्वास तू…
ओठ बिलगता मिटे पापणी तो क्षण खास तू…
अन वेड लावतो जीवास तो सहवास तू..

खळखळणा-या झ-यात तू
झगमगणा-या ता-यात तू
फुलात, पानात, रानात वनात,
सा-यात तू

तू असताना
मी जगतो युगासारखा
तू नसताना
क्षण भासे मज युगासारखा

दरवळणा-या मोग-यात तू
पारंब्यांच्या झुल्यात तू
हलणा-या अन डुलणा-या
वा-यात तू

तू हसताना
मी तुझ्या प्रतीबिम्बासारखा
तू रुसताना
मी आसवांच्या थेम्बासारखा

मोहरत्या फुलात
स्पंदन सांगे मनात तू
न दिसणा-या तरी असणा-या
प्राणात तू…

दे अजून काही

दिलेस मुक्त चांदणे दे अजून काही…
मिठीत बंद लोचने दे अजून काही 

मौनात अर्थ लागले चाचपून काही…
मिटून सर्व बंधने दे अजून काही…

लाजून अंग चोरत मोहरून जाई 
प्राशून सर्व चुंबने दे अजून काही 

वेचून फुल माळता तू सजून जाई 
सोडून केस मोकळे दे अजून काही 

होवून स्पर्श साजरे बावरून जाई 
वेढून घट्ट हात हे दे अजून काही

होता..

मोग-याचा तो सुगंधी वार होता..
त्या क्षणांचा तोच साक्षीदार होता…

मौन सारे लोचनांच्या पार होता…
हा तुझ्यासाठी जणू होकार होता…

सांडल्या त्या पाकळ्यांचा भार होता…
भार होता तो खरा आधार होता..

दु:ख सारे आसवांच्या पार होता…
भंगल्या स्वप्नात त्यांचा सार होता…

यातनांचा हा खुला बाजार होता…
वेदनांचा खास हा शेजार होता…