सांजवेळी कातरवेळी
असा कसा बिथरला पाऊस..
दूर राहिले मेघ रिक्त ते…
असा कसा बरसला पाऊस..
थेंब थेंब मिळून धारांनी…
पानापानात घरटे केले…
भिजून गेले चिंब पक्षी
सारे ते थरथरते झाले…
डोंगर द-यात एकच गंध..
जणू कुपीतून अत्तर यावे..
या भूमीचे अन नभाचे…
मर्मबंध चिरंतर व्हावे…
समीप येत पाऊस ओला
मनात पटकन झिरपून जातो…
पाकळ्यातले परागकण ते
भुंगा होऊन वेचून जातो…
येता पाऊस…येतो पाऊस…
दोन्ही हाता देतो पाऊस…
गजा आडुनी वीज दिसावी..
तसा चमकुनी येतो पाऊस..
वीज घुसावी अंतरात या…
अशी तुझ्या प्रीतीची किमया…
वरुनी पाऊस चेतवतो रे…
धुंद धुंद भिजलेली काया….