हृदयाचं घर..!!

कधी गेलं, कसं गेलं..कुठं गेलं बरं.
स्पंदनांच्यासह माझ्या हृदयाचं घर..
डाव मांडुनीया तू अडीच अक्षरांचा
जीवाला लावलीस अनोखी हुरहूर..

स्वप्नातून माझ्या जागा झालो खरोखरी
प्रत्यक्षात आली माझी स्वप्नातली परी…
आज नाही लागे डोळा माझ्या डोळीयांना ..
नजर खिळून राही टक्क भाळावर..

झोपेतच होतो इकडे, झोपेत तिकडे..
जळी, स्थळी, पाषाणी असे रूप तुझे खडे..
आरशात पाहता मी माझा चेहरा
तुझ्या गालाची खळी येते माझ्या गालावर..

भेट होता होते कसे काळीज सशाचे..
कोणी बोलायचे? अन उसासे श्वासांचे ..
नजरेला भिडे न नजर कुणाची..
अव्यक्त भावना व्हायची लज्जेनेच चूर..

जातानाही आणाभाका..पुढच्या भेटीच्या..
पुढच्या भेटीत नक्की बोलके होण्याच्या..
राहतो मी आता त्या स्वप्नांपासून दूर
हृदयाला मिळाले एक हक्काचे घर..!!