वय

वय माझ कोवळच होता..
तेव्हा कुठे येवू लागले होते उभार यौवनाला…
कुणी नेतो तिकडे सांगून..आणले..शहरात…
विकले दोन चार दिडक्याना…
त्या दिडक्यांची गुंतवणूक म्हणून सोडवली माझ्या शरीराची हुंडी…
हुंडी सुटली…
कागद फाटावा तसा.. एकदाच आवाज…नंतर तुकडेच तुकडे…
छिन्न विच्छिन्न …आवाज गेलाच बहुतेक…
रडण्याचा, हम्बरण्याचा…
कुणी येवू लागले… शोधू लागले स्वर्गाचे सुख… माझ्या इवल्याश्या दुनियेला नरक बनवून..
मी फक्त जणू मृतावस्थेत… कुणी आले, गेले.. कळायचेच नाही… व्यवहार करणारे…मजेत होते..
पानाच्या पिचका-या थुंकत थुंकत.. शिव्यांची सरबत्ती करत… मीच नव्हे.. माझ्यासारख्याच
काही, काही काय.. अनेक जणी तिथेच होत्या ….
कुणाची काय तर कुणाची काय… ब-याच जणींची तशीच परिस्थिती…
मग तेच लोक, तीच गिऱ्हाइक … मिळतील ते पैसे… थोडे ठेवायचे.. बाकी
घरी पाठवायचे… घराचे खुश.. भावंड शिकले…सावरले…
मोठी झाली..समजले पैसा कुठून आला तसे बोलेनासे झाले…
कमावलेला पैसा मिळाला…तो चालला… पण कुठून कसा कुणी ढकललं,
कोण नराधम आणि शिक्षा कुणाला.. याचा कुणी शोध नाही लावला…
एखादी झालीच पैदा पैदा ईश तर कुणाचे नाव लावायचा हा प्रश्नच…
त्यात जीवघेण्या आजाराने लपेटून घेतला आपल्याला तर ती पण थुंकणारी सुद्धा
हाकलून लावणार आपल्याला…
मग आधार कुणाचा?
आधी तरी कुणाचा होता आधार…?
जग कितीही बदललं तरी त्यांचा बायकांकडे बघायची नजर बदलतेय कुठे?
मग आधार कुणाचा?
आधी तरी कुणाचा होता आधार…?