पावसाला काय…?
कधी येईल उनाड मुलासारखा..
उधळवून लावेल सोबत वा-याला घेवून येत..
उडतील पाचोळे…लोक पळू लागतील सैरा वैरा…
मनसोक्त भिजणारे थोडेच असतील त्या गर्दीत..
काहीजण भिजतील नाईलजाने …
तरीही मनाला भिजविणारा पावूस
शोधात असेलच कुणीतरी… त्या गर्दीत..
घामोळ्याना घालवायला… कुणी भिजेल..
कुणी पैसा झाला खोटा म्हणत भिजेल..
कुणी पागोळीच्या थेम्बाखाली भिजेल..
कुणी फाटणा-या आभाळाखाली भिजेल..
भिजलाच नाही कुणी तर उन नाही भिजणार…
कुठेतरी गायब होवून कुणालाच नाही सापडणार..
कधीतरी सटीसमाशी दिसेल मग आकाशात..
इंद्रधनुचे रंग पसरत.. श्रावण येईल दिमाखात..
श्रावण सारी मग पुन्हा मनावर नाचू लागतील..
मोर पावलांनी काव्य सुचू लागतील..
कागदी होड्या पागोळीच्या पाण्यात दौलतील..
मनातली पागोळ्यातील आठवणीही भिजतील..
येताना जसा गडगडला तसाच जातानाही रुबाब असेल..
पुन्हा येणार केव्हा ? विचारातच…
‘आपला काही भरोसा नाही’ असा जवाब असेल..