मी

Posted: जून 1, 2012 in कविता

मी भेद पाहिला नाही.. 
मी खेद मानिला नाही.. 
यत्न यातना दोन्ही
मी देव शोधिला नाही… 


मी एक एकटा दोन्ही….
मी दान सांडले नाही…
हरता हरता हुकुमाचे 
मी पान मांडले नाही…

मी शोधीत बसलो नाही…
मी कुणास दिसलो नाही..
तो एकच वियोग होता 
मी जेव्हा हसलो नाही..

मी वादळ झालो नाही.. 
मी शांतही झालो नाही…
घोंघावत राहून सुद्धा 
मी कधी निनादलो नाही…

आताही कधी पाहावे
मी मुळीच उमगत नाही…
मलाच नाही, सगळ्या 
जगास समजत नाही…

कोण असतो आपण.. ?
एकमेकांच्या ओढीने इतके जवळ येतो
प्रेमाने, स्नेहाने…. जवळ असताना जाणवते अंतरंग…
बाह्यरंगाने लपेटलेले…. कोणाशी होता येत इतका एकरूप…??
कारण कुणीतरी हव हि गरज तुला माझ्या जवळ घेवून आली…
प्रेमाच्या मार्गाने..
तू जवळ असताना मी शोधत बसलो एकांत… स्वत:साठी ……
मग तुझ माझ असणं. फक्त माझ्यासाठी…
तुला वेळ देताना. स्वत : ला वेळ मिळेल का या प्रश्नात वेळ जात राहतो…
मी किती स्वार्थी आहे?….का ती माणसाच्या जगण्याची पद्धत आहे …
हेच कळत नाहीये…

ओल्या डोळ्यांच्या तळ्याशी…पापण्यांची किनार
उभे राहिले तयात आरक्तांचे मिनार….
ओझे हलके करून डोळे जडावले फार..
आता गालावरी जखमा ….अश्रुना त्या धार

आठवतंय?

Posted: फेब्रुवारी 22, 2012 in कविता

आठवतंय?
घरातली ओटी..
माजघर… आणि माजघरातील जाळीदार कपाट?
त्यात ठेवलेले दुध नि दही
भूक लागल्यावर खाल्लेले दही नि पोहे…?
सुट्टीमध्ये उन्हा तान्हात गल्लीबोळातून…
खेळलेले आणि आता खोलाम्बालेले खेळ..
विटी दांडू, आट्यापाट्या अन क्रिकेट..
लग्गोरी, डब्बा ऐसपैस न ढप-गोटी
एखाद्यानं नेम नाही म्हणून त्याच्यावर आलेली पिदी (काढणी)
आपल्याच झाडावर दगड मारून खाल्लेल्या आंबट कच्च्या कै -या
दमलो भागलो तरी दुपारची न घेतलेली विश्रांती…
आजीच्या हाताचा बरोबर ३ वाजता होणारा चहा?
कि अभ्यास नाही केला म्हणून मिळणारा धपाटा…
विमान उडवताना कौलावर अडकलेले विमान
ते काठीने काढतानाची आपली कसरत,
हातात सेल घेवून बोंब असल्याचे भासवत केलेले लुटूपुटुचे युद्ध..
खेळताना वेळेची असायची कुठे शुद्ध..
carrom असेल, पत्ते असतील, बैठे खेळ सगळे,
उन्हाळ्याच्या सुट्टीतील गप्पांचे अड्डे..
आठवतंय का तुम्हाला मधली सुट्टी… शाळेच्या मैदानात
सगळ ओझ झुगारून खेळलेली पळापळी, पकडापकडी ?
मोठे होते गेलो तशी शाळाही सुटली..
गल्लीतल्या दोस्तांची मैत्रीही सुटली..
खूप दूर गेले सगळे, गल्लीही नाहीशी झाली..
संगतीला पैसा अडका, खरी श्रीमंती नाहीशी झाली..
आठवतंय?
आठवत असेल तर तुमचा बालपण तुम्हाला अजून खुणावत असेल नक्कीच…
निसटून गेलेल्या क्षणांना हृदयाचे कोंदण मिळाले असेल नक्कीच..

एक थेंब..!

Posted: जून 14, 2011 in कविता

एक थेंब आला… थेंब अजुनी एक आला…
बघता बघता त्याचा पाऊस जाहला ..
ओलसर आठवणींची…शाल पांघरून मनी…
आणि गेला अलगद हिरवळ अंथरून अंगणी

कोण्या एका क्षणी त्याची तिची भेट
बोलायचे नाही …नजरा नजर थेट…

काजळाची रेषा … पापण्यांची दिशा …
तुझे ओठ बोले … मुकी मुकी भाषा ..

कुठला सवाल होता… उत्तराचा प्रश्न होता..
सांगू नयेच काही…ऐसा रिवाज होता…

ऐकायचे काय…बोलायचे काय…
सांगायला नाही …व्यक्त व्हावे काय .?

तू, मी अन तो…

Posted: जून 1, 2011 in कविता

ऊन आलं, मग मळभ आलं..
मळभ आलं.. मग ऊन आलं
कसला चालला आहे का खेळ…
तू कशाला लावतोस यायला इतका वेळ.
तुला कळत नाही ….. मलाही काम आहेत रे.खूप…
तू येणार म्हणून रोज वाळवण लवकर उचलून ठेवते मी….
उचलली कि मळभ निघून जाते.. आणि तू … येताच नाहीस…
इतका कशाला भाव खातोस…

माहितेय न?
तू येणार, तू आलास म्हणून लोक तुझ कौतुक करतील…
पण प्रचंड पडलास किवा पूर आणलास, लोकांची दैना उडवलीस
कि हीच लोक तुला शिव्या देतील….
मी मात्र मनमुराद तुझ्यामध्ये भिजेन..
गच्च चिखलावरच्या हिरवळीसारखी सजेन..

तू येतोयस न आता? बघ चहा करायची थांबलेय मी…
तू यायच्या आधीच्य उकाड्याने ओथांबलेय मी..
त्याचा फोन हि येवून गेला…म्हणाला….
एकत्र पावसात भिजायचं न?
मी त्याला म्हणाले येतेच..
पण मला न खर तर त्याच्याकडे जात असतानाच तुझ्याबरोबर भिजत जायचंय
…मग ये न…
तुला अगतिकता कळतच नाही माझी… आणि उगाच गडबड करू नकोस येताना
तुझी माझी भेट झाली हे कुणाला कळलं नाही पाहिजे…..
माझ मन भिजवणारा नक्की कोण… तू कि तो…
कुणालाच कळलं नाही पाहिजे…

मध्ये कॉफी वाफाळती… तिकडे तो आणि इकडे मी….
दोघांच्यात चाललेला निशब्द संवाद… आणि
खिडकीच्या गजांना तुझ्या येऊन गेल्याने चिकटलेला गारवा….!!